विविध विषयांवर आघाडीने पालिका धरली धारेवर!
By: प्रा. टा.
09 Dec 2024 9:24 PM
District Bhandara
Tumsar
तुमसर
विविध विषयांवर आघाडीने पालिका धरली धारेवर!
एक दिवसीय धरणे आंदोलन
शहरातील निकृष्ट कामांचा ठपका
तुमसर : राजकीय पक्षांचे वरदस्त असलेली तुमसर नगर पालिका सध्या एक अख्ख्या सत्ता कार्यकाळापासून प्रशासक राजवटीत आहे. त्यामुळे शहरात होत आलेली विकास कामे, त्यातील निविदांची घोडाबाजारी, रखडलेली कामे, होत असलेल्या कामांचा निकृष्ट दर्जा, अनेक कामांची थंडबस्त्यातील चौकशी, कंत्राटदारांचे राजकीय साटेलोटे आणि त्यातून बचावाचे अर्थपूर्ण आडमार्ग
यावर महविकास आघाडीच्या घटक पक्षांनी तुमसर शहरात एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारून पालिकेला धारेवर धरले आहे. त्या आंदोलन काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित राहिले. रखडलेले घरकुलचे टप्पे, गांधी सागर तलाव परिसरात चभौताल काठांची दुरवस्था,भुजली तलाव सौंदर्यीकरणाच्या कामातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार, पाणी पुरवठा योजनेचा फज्जा इत्यादी बाबी पालिकेच्या मुख्याधिकारी प्यारेवाले यांनी तत्परतेने हाताळून त्यावर योग्य ती कारवाई करावी व न्याय करण्याची भुमकी त्यावेळी आघाडीच्या नेत्यांनी घेतली.
------------
वाघमारे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात
- शहराला लागलेली भ्रष्टाचाराची कीड बहुतांशी राजकीय हस्तक्षेपामुळे शिगेला आली आहे. त्यावर विरोधक म्हणून भूमिका बजावणाऱ्या आघाडीच्या आंदोलन स्थळाला माजी आमदार चरण वाघमारे यांच्या भेटीने वेगळे वळण आले. मुख्याधिकारी प्यारेवाले यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांची बाजू मांडताना वाघमारे यांनी न्यायसंगत मार्ग अवलंबून लेखी स्वरूपात आश्वासनाची भूमिका घेतली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
------------------