शरद उद्गारले कर्तुत्वाने पुढे आलेल्या वाघमारेला जपणार!
By: Amit
13 Oct 2024 7:58 PM
District Bhandara
Tumsar
तुमसर
शरद उद्गारले कर्तुत्वाने पुढे आलेल्या वाघमारेला जपणार!
कार्यकर्त्यांसह वाघमारेंचा शरद गटात पक्षप्रवेश
तुमसर : निकटच्या काळातील राजकीय वर्तुळात रंगलेल्या माजी आमदार चरण वाघमारे यांच्या चर्चेवर अखेर पूर्ण विराम लागले आहे. काँग्रेस तर कधी उध्दव गटाची शिवसेना असा कयास बांधणाऱ्या वाघमारे यांनी शर्तेशेवटी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात धरली आहे. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात रविवार १३ ऑक्टोंबर रोजी शरद पवार यांच्या
उपस्थितीत वाघमारेंच्या पक्ष प्रवेशाने तुमसर मोहाडी विधानसभेत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्थानिक विधानसभेची येत्या निवडणुकीत समीकरणे बदलण्याची ही चाहूल असली तरी शहर पवार यांनी भाजपावर घणाघाती करणारे व वाघमारेंची बाजू सावरणारे भावनिक पोस्ट आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर केले आहे. राष्ट्रवादी प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून नेमका नवीन नेतृत्वांना संधी येणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्या कर्तुत्वाने व मोठ्या संघर्षातून स्वतःला सावरणाऱ्या वाघमारेला जपणार असल्याचे उद्गार शरद पवार यांनी त्यावेळी केले. त्यांच्या मुंबई
येथील पत्र परिषदेत तथा वाघमारे यांच्या करीता अपलोड केलेल्या लांबलचक त्या मार्मिक पोस्ट मधून तुमसर मोहाडी विधानसभेची जागा शरद गटाला असून चरण वाघमारे हेच उमदेवार असल्याची प्रचिती राजकीय जाणकारांना आली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीने चांगलीच कलाटणी मारल्याचे चित्र त्यातून अनुभवास आले आहे.
--------------
निवडणुकीचे चित्र बदलले
- तुमसर विधानसभेत सत्ता पक्षाचे आमदार असून सुद्धा महायुतीने अद्याप आपला उमेदवार घोषित केलेला नाही. मात्र त्या शर्यतीत राजू कारेमोरे पुढे गणले जात असले तरी भाजपने उमेदवारीची कास बाळगून ठेवली आहे. दुसरीकडे वाघमारे यांच्या पक्ष प्रवेशाने आघाडीतून तयारीला लागलेल्या शरद गटाच्या नेत्यांच्या वाटेला नैराश्य आल्याचे चित्र आहे. तर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा देखील भ्रमनिराश झाला आहे. मात्र हरियाणा राज्याच्या निकालामुळे आघाडी देखील आता महाराष्ट्राच्या त्या त्या विधानसभेतील स्थानिक समीकरणांचा विचार करण्यास बाध्य झाली असून त्यात पूर्व विदर्भातील तुमसर विधानसभेचा देखील समावेश असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
-------------------
वाघमारेंचे विरोधक एकवटले
- महायुती ठरवणार असलेल्या उमेदवाराला चरण वाघमारे टक्कर देण्याकरिता अपक्ष तयारीला लागले होते. मात्र पक्ष प्रवेशामुळे आघाडीतील घटक पक्षाचे स्थानिक नेते एकवटले असून त्यांचे शिष्टमंडळ विजयादशमीच्या दिवशीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाखतीला रवाना झाल्याची माहिती आहे. त्यांना हाताशी धरून शिष्टमंडळ मुंबईला चरण वाघमारे यांचा पूरजोर विरोध पक्ष श्रेष्ठींपुढे मांडणार आहेत.
--------------------
साकोलीचा टिकाव तुमसर विधानसभेच्या अवतीभवती
- राजकीय जाणकारांच्या मते साकोली विधानसभेतील तैलिक समाजाच्या मतांवर वाघमारेंचा प्रभाव असल्याने अंदाजे १२ हजारहून अधिकचे जातीय मतदान संरक्षित करण्याकरीता नाना पटोले यांच्याच कुरघोडीतून चरण वाघमारे यांनी तुतारी धरली आहे. तर तुमसर विधानसभेतील जातीय मतदानाचे ध्रुवीकरण, स्थानिक नेत्यांची बंडखोरी व स्वतः लढणार असलेल्या साकोली क्षेत्राचा टिकाव साधण्याकरीता पटोले यांनी एकच दगडात अनेक राजकीय समीकरणांची शिकार केल्याचे भासत आहे.
------------------
विरोधक उभे करणार तिसरी फडी?
- चरण वाघमारे यांना अनेक स्थानिक नेत्यांचा एकतर्फी विरोध आहे. त्यामुळे मुंबई रवाना झालेल्या शिष्टमंडळाला न्याय न मिळाल्यास त्यातूनच स्थानिक विधानसभेत तिसरी राजकीय फडी तयार होण्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. त्याचा नेमका फायदा कुणाला होणार याचे उत्तर शोधण्यात मतदारांना देखील कठीण होणार आहे.