भव्य रक्तदान शिबिरातून राष्ट्रपित्याला अभिवादन!
By: Amit
03 Oct 2024 4:37 PM
District Bhandara
Tumsar
तुमसर
भव्य रक्तदान शिबिरातून राष्ट्रपित्याला अभिवादन!
जिल्हाभरातील आयोजकांची उपस्थिती
मागण्या होणार पूर्ण
तुमसर : गांधी जयंती निमित्त शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्यामार्फत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. महात्मा गांधी तथा लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती दिनी समाज कार्याच्या माध्यमातून हुतात्म्यांना अभिवादन करताना आमदार कारेमोरे यांनी थोडक्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. रक्तदान हे श्रेष्ठदान असून त्यामुळे संकट समयी अनेकांचे प्राण
वाचविण्यात मदत होते. त्यामुळे रक्तदान केलेच पाहिजे असे मत त्यावेळी आमदार कारेमोरे यांनी व्यक्त केले. दरम्यान ३४ रक्तदात्या युवकांचे आमदारांनी विशेष कौतुक करत त्यांच्या लोकोपयोगी कार्याची दखल स्वरून चांदीची भेट वस्तू देऊन प्रत्येकांचे मनोधैर्य वाढविले. त्यात तोषल बुरडे, नितांत मोहतुरे, प्रणय देशभ्रतार, नेहाल खोब्रागडे, मनोज राखडे, अक्षय चौरे, निलेश बांडेबुचे, सुधिर रामटेके, विजेंद्र बुराडे, दुर्गेश्वर हिंगे, फलेश हजारे, नितीन सेलोकर, प्रमोद चावटकर , प्रशांत कुंजेकर, विनोद बनकर, अमेय चौधरी, मिलींद वाघमारे यांचा प्रामुख्याने सहभाग होता. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, तज्ञ डॉक्टरांची चमू उपस्थित होते.
--------------
आमदारांतर्फे शिबिर संचालकांचा सत्कार
- गांधी जयंती दिनी येणाऱ्या आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून तुमसरचे सामाजिक कार्यकर्ते तोषल बुरडे यांनी आमदारांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात भंडारा जिल्ह्यात रक्तदान शिबिरे राबवून गरजुंच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या संचालकांचा त्यावेळी सत्कार करण्यात आला. सदर नावीन्यपूर्ण सत्कार सोहळ्यात जिल्हाभरातून आलेल्या तब्बल १०० हून अधिक युवा संचालकांचा आमदार कारेमोरे यांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यात प्रामुख्याने लाखांदूर, सरांडी बुज, मोहाडी, पवनी, भंडारा, लाखनी, साकोली, तुमसर येथील शीबीर आयोजक उपस्थित होते.
----------------
शिबिर आयोजकांच्या समस्या लागणार मार्गी
- रक्तदान शिबिर राबविताना आयोजकांना काही विशेषाधिकार मिळतात. रक्तदान करणाऱ्याला नोंदणीचे तसे कार्ड देखील बहाल केले जाते. मात्र संकटसमयी ऐन गरेजच्या वेळी रक्तपेढीत रक्त उपलब्ध नाही, कार्डधारकांकडून डोनरची मागणी, अश्या विविध समस्यांना आयोजकांना समोर जावे लागते. आपल्या ज्वलंत समस्या आयोजकांनी आमदार तथा उपस्थित सीएस भंडारा यांच्यापुढे मांडल्या. त्यात प्रामुख्याने तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढीचे मागणी देखील त्यावेळी करण्यात आली. यावर समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन राजू कारेमोरे यांनी दिले.