भाजपातील दिग्गज महिला नेत्यांनी फिरवली त्या पत्र परिषदेकडे पाठ?
By: Amit
02 Oct 2024 9:52 PM
District Bhandara
Tumsar
तुमसर
भाजपातील दिग्गज महिला नेत्यांनी फिरवली त्या पत्र परिषदेकडे पाठ?
तुमसर : एकीकडे तुमसर मोहाडी विधानसभेत प्रत्येक राजकीय पक्षांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. तर दुसरीकडे आपणच पहिल्या पसंतीचे दावेदार असल्याचे गृहीत धरून अनेक दिग्गजांनी विधानसभा क्षेत्रभरात बॅनरबाजीचे रणसंग्राम सुरू केले आहे. त्यात महिला नेत्या कश्या मागे राहणार? नेतृत्वाची लालसा राजकीय वर्तुळात पुरुषांप्रमाणे महिलांनाही तितकीच, यात काही दुमत नाही. अश्यातच भाजपच्या महिला नेत्या कल्याणी भुरे यांनी पत्र परिषद घेऊन आमदारकीची आपली तीव्र इच्छा स्पष्ट केली आहे. विधानसभेच्या उमेदवारी
वरून मधल्या काळात अनेकांनी पत्र परिषद घेतल्या. मात्र भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे यांची पत्र परिषद काही वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. भुरे यांनी २ ऑक्टोंबर रोजी आपल्या स्वगृही आयोजित केलेल्या पत्र परिषदेला शहरातील इतर दिग्गज महिला नेत्यांना उपस्थित राहून पाठिंबा देण्याची विनंती वजा निमंत्रण दिले होते. मात्र आयोजित परिषदेला अनुपस्थिती दर्शवून त्या महिला पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे भुरे यांच्या राजकीय इच्छेला अदृश्य विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजप मधील महिला मोर्चा अंतर्गत उठलेले आंतरिक कलह यातून चव्हाट्यावर आल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत. त्याचा नेमका फायदा राजकीय पटलावर विरोधकांना कसा साधता येईल यावर विधानसभेत चिंतन सुरू झाल्याची चर्चा आहे.
------------------------
आयतखोर नेत्यांना कायमचा विरोध
- जुन्या अखंड राष्ट्रवादी पक्षातून कल्याणी भुरे यांनी त्यावेळी भाजप मध्ये प्रवेश केला. त्या क्षणापासून पक्षातील इतर महिला नेत्यांच्या पोटातील राजकीय दुखणे व त्यातून आयतखोरीची कुजबुज धगधगत होती. ती चर्चा मधल्या काळात विसावली असता भाजपने एका बलाढ्य नेत्याच्या दबावात महिला आघाडीची जिल्ह्याची धुरा कल्याणी यांच्याकडे सोपवताच ती विसावलेली आग पुन्हा पेटून उठली. त्यात राज्यात महिला धोरण राबविताना महायुतीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच महिला प्रतिनिधित्वाची रस्सीखेच तुमसर मोहाडी विधानसभेत देखील रंगली आहेत. तर भाजपमध्ये अन्य ज्येष्ठ महिला नेत्यांनी वरिष्ठ स्तरावर आपल्या उमेदवारीची इच्छा सादर केली असताना कल्याणी भुरे यांच्या पत्र परिषदेला त्यांनी आयतखोरीचे स्टंट ग्राह्य धरले की काय? अशी स्थिती अनुभवास येत आहे.
-------------------
उमेदवारीवरून भाजपात बंडखोरीचे पडसाद
- पंतप्रधान मोदी तथा केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी महाराष्ट्र राज्यात महायुती अटळ असल्याची स्पष्टोक्ती जाहीर सभेतून केली आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या घटक पक्षाने(राष्ट्रवादी अजित पवार गट) विद्यमान आमदार असलेल्या जागेची मागणी सुद्धा केली आहे. त्यात तुमसर मोहाडी विधानसभा सध्या अजित गटाच्या कब्ज्यात असताना महायुतीने जर ही जागा भाजप कडे वर्ग केली तर कल्याणी भुरे यांच्या मागणीमुळे उमेदवारी वरून भाजपात बंडखोरीचे पडसाद उमटण्याची चाहूल लागणार हे मात्र नक्की!
----------------
कल्याणीच्या मागणी रास्त!
- तुमसर विधानसभा अस्तित्वात आल्यापासून क्षेत्राला एकदाही महिला नेतृत्वाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे पत्र परिषदेतून कल्याणी भुरे यांनी व्यक्त केलेली आमदारकी लढविण्याची इच्छा रास्त ठरत आहे. तसे झाल्यास विधानसभेतील राजकीय समीकरणे एकदस्त बदलली जातील, यात काही दुमत नाही. मात्र शर्यतीत उभ्यांची लांबलचक रांग असताना नेमकी उमेदवारी कुणाच्या वाट्याला येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.